Wednesday, March 13, 2013

Heart attack and its remedies - Dr. Shishir Bhatkar

Disclaimer:

This article contains general information about medical conditions and treatments. The information is not advice, and should not be treated as such.

You must not rely on the information in this article as an alternative to medical advice from your doctor or other professional healthcare provider. If you have any specific questions about any medical matter you should consult your doctor or other professional healthcare provider. If you think you may be suffering from any medical condition you should seek immediately medical attention. You should never delay seeking medical advice, disregard medical advice, or discontinue medical treatment because of information on this website.
 


हार्ट अ‍ॅटॅक व त्यावरील उपचार - डॉ. शिशिर भाटकर (हृदयरोग व श्वसनविकार तज्ञ)


आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये संसर्गजन्य रोगांचे प्रमाण कमी होऊन माणसाचे सरासरी आयुष्य वाढले असले तरीही बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार उदा. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात यांचे प्रमाण वाढले आहे. हृदयरोगामध्ये हृदयाला रक्तपुरवठ्या अभावी होणारे आजार (Ischaemic heart disease), झडपांचे आजार, हृदयाच्या स्नायूंचे आजार, अनियमित स्पंदनाचे आजार, जन्मतःच आढळणारे आजार इत्यादींचा समावेश होतो. सर्व साधारण हृदयरोग किंवा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) हा शब्द वापरला जातो तेव्हा हृदयाला होणारा रक्त पुरवठा कमी किंवा खंडित झाल्यामुळे होणारा आजार (Ischaemic heart disease) असा अर्थ अभिप्रेत असतो. आपले हृदय हा स्नायूंनी बनलेला पंप असून त्याचा स्पंदनामुळे सर्व शरीराला रक्त पुरवठा होत असतो. हृदयाच्या स्नायूंचे पोषण त्यांना रक्त पुरवठा करणाऱ्या Coronary arteries वाहिन्यांतर्फे होत असते. या रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा आल्यास हृदयाच्या स्नायूंचे पोषण नीट होत नाही व हृदयरोग संभवतो.



 
स्थिर अंजायना:

यामध्ये रुग्णाला ठराविक शारीरिक श्रम केल्यावर छातीत मधोमध दुखू लागते. विश्रांती घेताच किंवा सॉर्बिट्रेट ही गोळी जीभेखाली ठेवताच दुखणे ताबडतोब थांबते. या प्रकारात रुग्णाला अॅडमिट करणे अत्यावश्यक नसते. हा आजार औषधे-गोळ्या घेऊन नियंत्रणात ठेवता येतो. याच्या तीव्रतेत वाढ होऊन जर याचे रुपांतर अस्थिर अंजायना मध्ये झाले किंवा काही विशेष रुग्णांच्या बाबतीत या आजाराला पुढील ट्रिटमेंट म्हणजे अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करता येते.

अस्थिर अंजायना:

यामध्ये रुग्णाला आयुष्यात प्रथमच छातीत दुखू लागते. विश्रांती घेत असतानाही दुखू लागते अथवा स्थिर अंजायनाच्या तीव्रतेमध्ये वाढ होते. या प्रकारच्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये (ICCU) ठेवणे हितकारक असते कारण याचे रुपांतर हार्ट अ‍ॅटॅक मध्ये होऊ शकते. प्रथमत: याचे उपचार इंजेक्शन-गोळ्या यांनी करून नंतर अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी यांचा विचार केला जातो.
 
हार्ट अ‍ॅटॅक (हृदयरोगाचा झटका) :-

यामध्ये रुग्णाला खूप तीव्रतेने छातीत मधोमध दुखू लागते. ही वेदना मान, गळा, डावा हात, पाठ व कधी उजवी छाती व उजवा हात या भागांमध्ये पसरू शकते. कधी कधी छातीत न दुखता इतर जागीही दुखू शकते. याबरोबर छाती कोडणे, घाम येणे, घाबरल्या सारखे वाटणे, उलटी येणे अशी लक्षणे दिसतात. हा आजार गंभीर आहे. यामध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणार्‍या रक्त वाहिन्यांमध्ये संपूर्ण अडथळा झाल्याने रक्त पुरवठा तुटतो व स्नायू मृतवत होतात. या झटक्यामध्ये अकस्मात मृत्यू होण्याची शक्यता असते. ती दोन कारणांमुळे. त्यातील एक म्हणजे हृदयाचे अनियमित व जलद ठोके व हृदय बंद पडणे व दुसरी म्हणजे हृदयाचे स्नायू फाटणे. हृदयाची पंपिंगची शक्ति कमी झाल्याने दम लागतो. डायबेटीस रुग्णांमध्ये व वृद्धांमध्ये बर्‍याचदा छातीत न दुखता फक्त दम लागतो. (Silent infarct)

रक्तवाहिन्यांची स्थिति :-

हृदयाला रक्त पुरवठा करणार्‍या तीन Coronary arteries असतात –





हार्ट अ‍ॅटॅक वरील उपचार :-

हार्ट अ‍ॅटॅक मध्ये रुग्णाला ICCU (अतिदक्षता विभाग) मध्ये अॅडमिट करावे लागते. 2-3 दिवस ICCU मध्ये व त्यानंतर 2-3 जनरल वॉर्ड मध्ये 5 दिवसांनंतर पेशंटला डिस्चार्ज देता येतो. जर कुठली गुंतागुंत झाली तर हा काळ वाढतो.

ICCU मधील उपचार :-

1) पेशंटला हार्ट अ‍ॅटॅक आला आहे की नाही याची खात्री ECG (Electro cardiogram) व काही रक्ताच्या तपासण्या (CPK-MB) करून केली जाते.

2) खात्री झाल्यावर सॉर्बिट्रेट गोळी जीभेखाली व अ‍ॅस्पिरीनची गोळी चावून खायला देतात. हार्ट अ‍ॅटॅक शक्यता दाट असताना अगदी ECG काढण्यापूर्वीच हे उपचार दिले जातात. हल्ली क्लोपीडोग्रेल या गोळ्याही खायला दिल्या जातात.

3) हार्ट अ‍ॅटॅक असल्याची खात्री झाल्यावर दोन पद्धतीने उपचार करता येतात.



प्रायमरी अँजिओप्लास्टी

अँजिओग्राफी करून अ‍ॅटॅकसाठी कारणीभूत ठरलेल्या रक्तवाहिनीतील अडथळा नळीद्वारे व फुग्याद्वारे साफ केला जातो व धातूची जाळी टाकून तो मार्ग पूर्ववत केला जातो ही सर्वोत्तम पद्धत पण दोन तोटे.
1) महागडी, सर्वसामान्यांना न परवडणारी
2) कँथ लॅब 1-2 तासाच्या अंतरावर असेल तरच शक्य
रक्तवाहिनीतील रक्ताची गुठळी विरघळवून टाकणे (fibrinolysis)
 
इंजेक्शन स्ट्रेप्टोकायनेज किंवा युरोकायनेज किंवा TPA देऊन व त्यानंतर इंजेक्शन हिपँरिन देऊन गुठळी विरघळवली जाते व काही प्रमाणात रक्तपुरवठा सुरू होऊन रुग्णाला आराम मिळतो. यासाठी रुग्णाला शक्य तेवढ्या लवकर अॅडमिट करणे जरूरी असते. पहिल्या 6 तासामध्ये या इंजेक्शनचा जास्त फायदा होतो. त्यात ही पहिला तास हा सुवर्णकाळ मानला जातो.
सोपी व स्वस्त पद्धत.
तोटे :-
1) प्रत्येक वेळी पूर्णतः यशस्वी होतेच असे नाही.
2) काही रुग्णांना पक्षाघात, ऑपरेशन, अल्सर यांचा त्रास नुकताच झाला असेल त्यांना इंजेक्शन देता येत नाही.
 
 
इंजेक्शन दिल्यानंतर किंवा अँजिओप्लास्टी केल्यानंतर गरजेप्रमाणे तज्ञ डॉक्टर्स नायट्रेटस, क्लोपिडोग्रेल, अ‍ॅस्पिरीन, बीटा ब्लोकर्स, ACEI, कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी गोळ्या, या प्रकारची औषध योजना करतात.

काही वेळा इंजेक्शन देऊनही छातीत दुखायचे कमी नसेल किंवा पुन्हा दूसरा अ‍ॅटॅक आला तर इमर्जन्सी अँजिओग्राफी करून प्रायमरी अँजिओप्लास्टी करणे शक्य नसेल तर इमर्जन्सी बायपास सर्जरी देखील केली जाते. सध्यातरी कोकणसारख्या ठिकाणी रुग्णाला प्रायमरी अँजिओप्लास्टी किंवा इमर्जन्सी बायपास सर्जरी या सोयी हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर तात्काळ उपलब्ध होऊ शकत नाहीत.

हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतरचे उपचार :-

हार्ट अ‍ॅटॅकनंतर जर छातीत दुखणे चालूच राहिले तर ताबडतोब अँजिओग्राफी करून रक्तवाहिन्यातील अडथळे तपासणे गरजेचे ठरते. अन्यथा 4 आठवड्यानंतर खालील दोन तपासण्या केल्या जातात.

1) स्ट्रेस टेस्ट :-

शक्यतो 4 आठवड्यानंतर करतात. काही ठिकाणी 1 आठवड्यानंतरही केली जाते. या चाचणीमध्ये रुग्णाला एका विशिष्ट वेग मर्यादेमध्ये धावायला लावून त्याचा ECG काढला जातो. यामध्ये रुग्णाला जाणवणारी लक्षणे,  ECG मधील बदल याची सांगड घालून रुग्णाची हृदयाची कार्यक्षमता आजमावली जाते. ही चाचणी पोझिटिव आली तर अँजिओग्राफी करणे इष्ट.

2) एकोकार्डिओग्राफी (ECHO) :-

या चाचणीत ध्वनिलहरींच्या सहाय्याने हृदयाच्या हालचालीची, आकाराची, झडपांची तसेच हृदयाच्या कप्प्यांमध्ये गुठळ्या आहेत का व हृदयाभोवती पाणी झाले आहे का यांबद्दल माहिती मिळते.

वरील दोन चाचण्या सध्या सोप्या असून त्यामधून मिळणारी माहिती मात्र मोलाची असते. या चाचणीमध्ये हृदयाच्या कार्यक्षमतेत बिघाड असल्यास पुढची चाचणी म्हणजे कॉरोनरी अ‍ॅँजिओग्राफी केली जाते.

कॉरोनरी अ‍ॅँजिओग्राफी :-

या चाचणीमध्ये रुग्णाच्या मांडीतील धमनीमधून हृदयापर्यंत नळी घालून तेथे विरोधी रंग द्रव्याच्या सहाय्याने हृदयाला रक्त पुरवठा करणार्‍या वाहिनीची चित्रे घेतली जातात. या तपासात तीन रक्त वाहिन्यांपैकी कोणत्या वाहिन्या किती ठिकाणी व किती प्रमाणात (%) बंद झालेल्या आहेत याची माहिती मिळते.




हार्ट अ‍ॅटॅक आलेल्या प्रत्येक व्यक्तीने कॉरोनरी अ‍ॅँजिओग्राफी केली पाहिजे असा नियम नाही. ज्यांना हार्ट अ‍ॅटॅक नंतर कोणताही त्रास होत नाही व ज्यांची स्ट्रेस टेस्ट निगेटिव आहे अशांच्या बाबतीत आपण निरीक्षण करून वाट पाहू शकतो. परंतु हे सर्व तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्हावे.

कॉरोनरी अ‍ॅँजिओग्राफी कोणाची करावी? :-

1) हार्ट अ‍ॅटॅक नंतर अंजायना (छातीत दुखणे चालूच असेल तर)

2) पुन्हा दूसरा हार्ट अ‍ॅटॅक आलेल्यांना (Reinfarct)

3) हार्ट अ‍ॅटॅक दरम्यान काही गुंतागुंत झालेली असल्यास

4) अ‍ॅटॅक नंतर स्ट्रेस टेस्ट पोझिटिव असल्यास

5) स्ट्रेस टेस्ट ज्या रुग्णांमध्ये करणे शक्य नसेल तरी एकोकार्डिओग्राफीमध्ये (ECHO) ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी असते अशा रुग्णांची.

6) तरुण रुग्ण


कॉरोनरी अ‍ॅँजिओग्राफीच्या निष्कर्षावरुन पुढील दोन प्रकारच्या उपचार पद्धती केल्या जातात.

1) अ‍ॅँजिओग्राफी नॉर्मल असल्यास फक्त औषधांवर रुग्णाला ठेवता येते.

2) अ‍ॅँजिओग्राफी मध्ये दोष आढळले तर दोन प्रकारे उपचार करता येते.

अ) कॉरोनरी अ‍ॅँजिओप्लास्टी व स्टेटोंग (धातूची जाळी)

 

 
ब) बायपास सर्जरी



हल्ली नवीन प्रकारचे ड्रग इल्यूटोंग स्टेंट उपलब्ध आहेत जे जास्त परिणामकारक आहेत.
 
कोणाला काय करावे?


कॉरोनरी अ‍ॅँजिओप्लास्टी व स्टेटोंग
1) एक किंवा दोन रक्त वाहिन्या बंद असल्यास व तिथपर्यंत नळी जाऊ शकत असल्यास
2) नुकतीच बायपास झाल्यानंतर पुन्हा त्रास उद्भवल्यास
3) जे रुग्ण इतर आजारांमुळे बायपास सर्जरीसाठी सक्षम नसतील तर त्यांना.

बायपास सर्जरी
 
1) तीनही रक्तवाहिन्या बंद
2) मुख्य रक्तवाहिनी (Left Main) बंद.
3) दोन रक्तवाहिन्या बंद व हृदयाची कार्यक्षमता कमी
4) झडपांचे आजार
5) अ‍ॅँजिओप्लास्टोची नळी अडथळ्यापर्यन्त नीट न गेल्यास किंवा अ‍ॅँजिओप्लास्टो करून ती यशस्वी न झाल्यास
6) टाइप I डायबेटीस
 
बायपास सर्जरीपूर्वी बर्‍याचदा ऑपरेशननंतर हृदयाचे स्नायू रक्तपुरवठा पूर्ववत होऊन व्यवस्थित काम करतील का? याची माहिती करून घेण्यासाठी थॅलियम स्कॅन (Thallium scan) करतात.

हार्ट अटॅकनंतरची कार्यशैली :-

हार्ट अटॅक आल्यानंतर जर कोणतीही गुंतागुंत नसेल तर पुढील पद्धतीने वागावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावे.

1) 2 आठवडे घरीच विश्रांती घेऊन रुग्ण घरामध्ये व घराभोवती सपाट जमिनीवर चालू शकतो.

2) या काळात कोणताही त्रास झाल्यास डॉक्टरांना कळविणे व सल्ला घेणे.

3) 2 आठवड्यानंतर समागम करू शकतो.

4) 2 आठवड्यानंतर जीवनक्रम कसा असावा हे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व स्ट्रेस टेस्टच्या निष्कर्षावर ठरवावे.

5) 4-6 आठवड्यानंतर कामावर हजर राहायला हरकत नाही.
 
हार्ट अटॅक टाळण्याची जीवनशैली :-

1) धूम्रपान व मद्यसेवन थांबविणे.

2) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करणे. सपाट जमिनीवर चालणे हा उत्तम व्यायाम. परंतु व्यायाम हा व्यक्तिगत क्षमतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवावा.

3) तसेच ब्लडप्रेशर, या डायबेटीस या आजारांना नियंत्रणात ठेवणे.

4) वजन नियंत्रित ठेवणे, पोटाचा घेर व नितंब यांचे प्रमाण संतुलित ठेवणे.

5) रक्तातील कोलेस्टेरोलची चाचणी व त्यावर नियंत्रण ठेवणे यासाठी गोळ्या व योग्य आहार व व्यायाम उपयुक्त ठरतात.

6) योग्य आहार :-

तेलकट कॅलरीयुक्त, चरबीयुक्त पदार्थ टाळावेत. तंतुमय पदार्थ जास्त खावेत. फळे, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये यांचा सढळ वापर आहारात करावा. अंड्याचा पिवळा बलक, मटण (बकरी, गोमांस म्हणजेच लाल मटण), खेकडा, कोळंबी, शिंपल्या खाऊ नयेत. कोंबडी व मासे चालतील परंतु न तळता. आईस्क्रीम, चॉकलेट, कोलड्रिंक्स नको. नारळाची चटणी नको.

मिठाचे प्रमाण अत्यल्प असावे. पापड, लोणचे, चटण्या, खारे मासे व्यर्ज. दर दिवशी माणशी 15 मिलि तेल वापरावे. शेंगदाणा, सोयाबीन, मोहरी, सूर्यफूल इत्यादि तेलांचा वापर करावा.

7) मानसिक ताणाचे नियंत्रण :-

आजच्या युगात मानसिक ताण हा पूर्णपणे टाळणे आपल्याला अशक्य असले तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यासाठी योगासने, ध्यान, प्राणायाम, शवासन इत्यादींचा तज्ञांच्या सल्ल्यानुसार स्वीकार करावा.

ज्या पेशंटना हार्ट अ‍ॅटॅकचा त्रास जाणवू शकतो अशा सर्वांना तसेच काही वृद्धांना सर्व प्रकारची औषधे एकत्रित असणारी पॉलिपील (Polypill) काही काळानंतर बाजारात उपलब्ध होईल. या एका गोळीमध्ये ब्लडप्रेशर, कोलेस्टेरॉल यावर नियंत्रण करणार्‍या व अ‍ॅस्पीरिन क्लोपीडॉग्रेल सारख्या गोळ्यांचे मिश्रण असेल. परंतु यावर संशोधन चालू आहे.

सर्व गोष्टींचा गोषवारा घेतल्यास असे जाणवते की, भारतासारख्या विकसनशील देशामध्ये हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतरचे महागडे उपचार अवलंबण्यापेक्षा हृदयरोग होऊ नये यासाठी उपाय योजणे हे केव्हाही उचित.